दबा…
53318091
तो रस्ता; खर तर रस्ता नव्हेच, चिंचोळी गल्ली होती, काळवंडलेला होता. त्याला कारणही तसच होत. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कधी-काळी जोमात सुरु असलेली, गाडया दुरुस्त करण्याची गरेज. ज्यांच्या खिडक्या, दार सगळच काळवंडलेल होत. ज्यात भर पडली आजू-बाजूस मोकाट वाढलेल्या उंच आणि गर्द झाडीची. भर दिवसा देखील त्या रस्त्या वर जवळपास काळोख असे, जसं काही कुणी एक मोठी  छत्रीच धरल्ये त्या परिसरावर. अगदी एका पाठोपाठ एक अशी ती गरेज गेले कित्येक दिवस बंदच होती. कारण होत त्या गरेजेसच्या जागी प्रस्तावित असणारी इमारतींची कॉलनी. ज्याला गरेजच्या मालकांचा विरोध होता.  
अशा रस्त्याने जाणं कुणाला आवडण्याची शक्यता नव्हतीच. पण त्या रस्त्यने गेलं, की स्टेशनला फक्त पाच मिनिटात पोहचता येत, असा शोध जेव्हां पासून लागला, तेव्हा पासून त्या रस्त्यावर गर्दी अशी नाही पण थोडी फार वर्दळ दिसू लागली.    
रस्ता तसा निर्जनच होता, आज-काल तर अधिकच. जेव्हां पासून तो माणूस लोकाना एकट गाठून घाबरवत असे, प्रसंगी मारहाण सुद्धा करे. आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून जाई. 
येताना जरी ती पाच मुलं वेगवेगळ्या मार्गांनी येत असली, तरी शाळा सुटली की त्या रस्त्यावरून स्टेशन कडे जात. सुरुवातीला त्यातली एक-दोन सोडली तर बाकीची तयार नव्हतीच त्या रस्त्याने जायला. पण शाळा सुटत असे चारला आणि क्लासची वेळ होती साडे चार. आणि त्या रस्त्याने स्टेशनला गेलं, तर वेळ वाचेल म्हणून तयार झाली . त्यात देखील निमिष सगळ्याच्या मधून चालत असे. 
निमिषची आई त्याला तो कसा इतर मुलांपेक्षा कमी आहे हे सांगत नसे. तिची ते जाणवून देण्याची पद्धत वेगळी होती. त्या निलेशला म्हणे नव्वद टक्के मार्क पडले, किंवा खरच, पराग काय क्रिकेट खेळतो नाही? आई त्याला थेट काही बोलली तर त्याला हवं होत. पण इतर मुलाचे चांगले गुण सांगून ती त्याचा कमीपणा दाखवून देत होती, जेव्हां-जेव्हां ती असं काही बोले, तेव्हा त्याच्या मनात भीती निर्माण होत असे, की आतां ती आपल्यात काय कमी आहे ते सांगणार आहे…  
   
भीती ही मनात असते. तसं प्रत्येक भावना ही मनातच जन्म घेते. एखाद्या बद्दल प्रेम किंवा द्वेष वाटण, आपुलकी वाटण… सा   चा उगम मनातच तर होतो. स्वत:च्या मनातली भीती घालवायची असेल, तर दुस    ना घाबरवायचं. Attack is the best defense.  

———————————————————

तो रस्ता तसा निर्जनच होता, आज-काल तर अधिकच. जेव्हां पासून काही लोकाना तो माणूस अंधारातून अचानक समोर येऊन घाबरवत असे, प्रसंगी मारहाण सुद्धा करे. आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून जाई. पोलिसांनी गस्त घालून देखील तो आज पर्यंत सापडला नव्हता. आणि आतां तो सापडण्याची शक्यता ही नव्हती. कारण बरेच दिवस झाले, त्या रस्त्याने कुणी गेलं नाही. त्यामुळे तो कुणालाच परत दिसण्याची शक्यता नव्हती. काही दिवसांनी तो रस्ता रुंदीकरणात नाहीसा झाला. आणि त्याच बरोबर तो माणूस सुद्धा. पण आज ही काही जण त्या माणसाच्या भीतीने झोपेत मध्येच जागी होतात. चेहरा घामाने डबडबलेला, घसा कोरडा, निर्जीव डोळे, अशा अवस्थेत ते अंधारात बराच वेळ बसून असतात. खरच, तो निर्जन रस्ता आतां नाही, पण काय तो माणूस सुद्धा आतां नसेल ? निळ्या रंगाचा स्वेटर घातलेला ? की आतां तो अशाच दुस   निर्जन रस्त्यावर थांबला असेल ? लोकाना घाबरवून स्वत:च्या मनातली भीती घालवू पाहणारा….     

                                       —————————

 ०.१ % चे रहस्य

दुपारी दीड वाजता दारावरची बेल वाजते तेव्हा, ‘ हे सेल्समन दुपारीच का तडमडतात ? ‘, ‘ खर तर ह्यांना बिल्डींग मध्ये येऊन नाही दिल पाहिजे ‘, ‘इतका वेळ मी जागी होते, जरा कुठे पाठ टेकत्ये तर …’ इथपासून ‘ काय कटकट आहे बाई शी:! ‘ अशा विविध प्रतिक्रिया ऐकू येतात. पण सुनिधी ह्या सगळ्याला सरावलेली होती. खांद्यावर लटकवलेली पिशवी सारखी करत आणि कपाळावरचा घाम रुमालाने टिपत ती दार उघडण्याची वाट पहात थांबली. हो ! ट्रेनिंग मध्ये ज्या अनेक टिप्स दिल्या गेल्या, त्या पैकी ही महत्वाची. घाम पुसायचा नाही, फक्त टिपायचा. दार उघडल्यावर अगदी थकलेला भाव हवा चेहर्यावर. म्हणजे समोरच्या माणसाला अनुकंपा वाटते. बिच्चारा सेल्समन ! असं काहीस.

आज सुद्धा आतून ‘ कोण आहे ? ‘ असा त्रासलेला आवाज आला पण दार उघडल. लगेच बोलायचं नाही, एक क्षण थांबायचं. आपल प्रोडक्ट लगेच दाखवायचं नाही. दार उघडणा    व्यक्तीच्या चेहर्यावर कोणते भाव आहेत, ते पटकन बघायचे. मग सुरुवात करायची…

‘ मी तुमची झोप मोड तर नाही ना केली ? ‘ अंदाज घेत सुनिधीने विचारल.
‘ नाही हो … थोडी पडलेवते, इतकच…  ‘ आतली स्त्री पंचेचाळीसची असावी.
‘ मला अहो काय म्हणताय, लहान आहे मी तुमच्याहून … मी आत आले तर चालेल का ? ‘ सुनिधी हसून म्हणाली.
‘ ये … ‘

मार्केटिंगच्या निमित्ताने सुनिधी रोज वेगवेगळी घरं, त्यात राहणारी माणसं निरखत असे. दार उघडणारी व्यक्ती शिकलेली आहे की नाही हे ती एक दोन वाक्यातच ओळखत असे. इतकच काय, केवळ एखादया घरातील फर्निचर कसं मांडलेल आहे, ह्या वरून सुद्धा घरातली माणसं कशी असावीत ह्याचा अंदाज ती बांधत असे. कोणत्या स्त्री ला काय सांगायचं, ते सुनिधी आयत्या वेळी ठरवत असे.

‘ फार वेळ नाही घेत मी तुमचा. हा फ्लोअर स्प्रे बघा. मल्टी पर्पज आहे. थांबा. मी तुम्हाला डेमोच देते ना … ‘ म्हणत तिने पिशवीतून बॉटल काढली.

‘ जमीन म्हणजे अंग. आणि बोडी स्प्रे, तसा फ्लोअर स्प्रे ‘. सुनिधी मार्केटिंगचा सगळा फंडा वापरत होती.
‘ पण मी तर ऐकलय की फ्लोअर क्लीनर मुळे फरशांच पोलिश खराब होत. कारण त्यात म्हणे केमिकल्स असतात ‘… त्या स्त्रीने कुठे तरी वाचल असणार…
‘ मी तुम्हाला सांगणारच होते त्या बद्दल. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असेल ही. पण ह्या फ्लोअर स्प्रे मध्ये केमिकल्स अजिबात नाहीत ‘. खर तर सुनिधीच्या ओठांवर ‘ अहो आपल सगळ भवताल कोणत्या ना कोणत्या केमिकल्सने भरलेलं आहे. तरी आपण श्वास घेतोच आहोत ना ? असं काही तरी आलं होत. पण तिने ते दाबून टाकलं. काय करणार ? सत्य सांगितल तर लोक विश्वास ठेवत नाहीत …

‘ हे पहा, मी जमिनीवर अगदी थोडा स्प्रे मारते ‘. म्हणत तिने स्प्रे मारला आणि मऊ फडक्याने पुसून घेतला. जमिनीचा तो भाग आणि त्या स्त्रीचा चेहरा;  दोन्ही वर चमक दिसू लागली. ह्या घरात कमीत कमी दोन ते तीन स्प्रे खपण्याची शक्यता तिला दिसू लागली. आणि डील क्लोज करण्यासाठी सुनिधीने तिचा हुकुमी एक्का बाहेर काढला.

‘ पाहिलत ? शिवाय ह्यात आहे ९९.९ % बक्टेरिया मारण्याची शक्ती’. बक्टेरिया ह्या शब्दाला स्त्रिया सर्वाधिक घाबरतात, असा तिचा अनुभव होता. खर तर डोळ्याना न दिसणारे, तरी पाण्यात, खाण्यात, हातांवर, इतकच नाही तर फर्निचर वर, भिंतींवर, कपड्यांवर सुद्धा बक्टेरिया असावेत असं त्यांना वाटत असत.

‘ तुमचा टू रूम किचन फ्लट आहे ना ? मग तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये एक, असे तीन स्प्रे तरी लागतील ‘… सुनिधी किती स्प्रे देऊ, असं कधीच विचारत नसे. जागेचा अंदाज घेऊन स्वत:च ठरवे. सहसा तिला नकार मिळत नसे.

‘ ठीक आहे. दे तीन ‘. ती स्त्री म्हणाली. सुनिधीने पिशवीतून तीन स्प्रे काढून टेबलवर ठेवले.

‘ पण मला एक नाही कळलं. ह्या स्प्रे मध्ये ९९.९ % बक्टेरिया मारण्याची शक्ती आहे, १०० % का नाही ? ‘ त्या स्त्रीने बाउन्सरच टाकला.

अशा प्रश्नाने एखाद्याची दांडी गुल व्हायची, तशी ती सुनिधीची सुद्धा झाली. पण क्षणभर. मग ती सावरली.

‘ कसं असत ना… गणितात जसं सगळी उत्तर अचूक असली, तरी नव्व्याणऊ मार्क्स देतात, शंभर पैकी शंभर नाही. तसच ‘.

‘ म्हणजे खर तर १०० % बक्टेरिया मरतात, पण तसं म्हणता येत नाही ?

‘ हो. तसच काहीस… ‘ सुनिधी घाई – घाईने म्हणाली. आणि एका धर्म संकटातून वाचलो असा विचार करत तिने अगदी खसखसून घाम पुसला!


विहार …

” जेव्हां पतंग नुसता भिरभिरेल, तेव्हा मांजा स्थिर धरायचा… थोड्या वेळाने हाताला ताण पडला, की समजायचं तो स्थिर झालाय. मग हळू – हळू ढील द्यायची. “. आकाशाकडे बघत निखील म्हणाला.

गेले तीन दिवस शर्विन आणि निखील, त्याचा दादा, रोज येत असत इथे पतंग उडवायला. पतंग उडवावा तर निखील दादानेच, असं लहानग्या शर्विनला वाटे.

ते दोघ उभे होते घराच्या सगळ्यात वरच्या बाजूस असलेल्या छपरावर. जिथून सारा परिसर अगदी चित्रा सारखा दिसत असे. स्थिर, जागच्या जागी खिळलेला. डाव्या अंगाला दिसणारी परांजपेंची गर्द आमराई. त्याला खेटून असणारी दाते आळी. तिथून काही अंतरावर छतरमलची कोळश्याची वखार. नंतर मोकळ आवार. तर उजवीकडे खेमकरांच, मग बहुलकरांच, असं करत – करत आठ – दहा घर पुढे बच्चू भाईच किराणा दुकान, नंतर थोडी मोकळी जागा सोडली, की रास्तेंचा वाडा… आणि ह्या दोन्ही मधून जाणारा रस्ता, जो लांबवर दिसणा   एस टी स्टण्ड कडे जाई. तिथे ये – जा करणा   लाल चुटूक एस टी गाड्यांच शर्विनला फार अप्रूप वाटे. दर वेळी घरातल कुणी शहरात गेलं, की ‘ मला आण की लाल गाडी ‘ अशी गळ तो घाले.

12 (2)
छपरावर उतरण्यासाठी एका वेळी एकच माणूस उभा राहू शकेल, इतका लहान सज्जा होता, जिथपर्यंत एका गोलाकार जिन्याने यावं लागे. लहान मुलांना तो जिना वर्ज्य होता. बरोबर कुणी मोठ असेल, तर मात्र परवानगी मिळे. जसं आज.

” खर तर पतंग एका ठराविक उंचीवर गेला, की आपण फार काही करू शकत नाही. कारण तो जितका अधिक उंच आणि लांब जाईल, तितका तो लहान दिसेल. आणि त्याला नजरे आड तर नाही ना करू शकत आपण ? माणसांच तसच असत. ती एका ठराविक अंतरावर असली, तर आपली वाटतात. दूर गेली की … ” निखील दादा म्हणजे पतंग उडवण्यात खरा ‘ दादा ‘ माणूस. पण तो असं काही बोलायला लागला, की शर्विन अगदी तन्मयतेने ऐकत असे. खर तर त्याच वय नव्हत असं काही ऐकण्याच, पण का कुणास ठाऊक, ते ऐकताना त्याला अगदी मोठ झाल्या सारख वाटे.

” म्हणजे आपली निशा ताई अमेरिकेला गेली, तसं ? ”

” हं … ”

तितक्यात कुठूनसा एक लाल रंगाचा पतंग सरसरत जवळ येऊ लागला. निखील पतंग उडवण्यात दंग होता. पण शर्विनच लक्ष मात्र लगेच वेधल गेलं.

” दादा ….. तो बघ लाल पतंग आपल्या जवळ येतोय ! ” शर्विन ओरडला.


निखील काहीच बोलला नाही. त्याने डाव्या बाजूला जात शांतपणे मांजा ओढायला सुरुवात केली. लाल पतंग चाल करून येतोय असं वाटलं. पण थोड्याच क्षणात तो देखील नमत घेतल्या सारखा बाजूला झाला.

सूर्य आतां कलू लागला होता. माणसांच्या सावल्या लांब होत होत्या. आमराईत कोकिळेने कुहू – कुहू ची साद घातली.

” आपण काटा – काटी का नाही रे करत दादा ? ” जिना उतरताना शर्विनने विचारल.


” कसं आहे ना शर्विन… एकदा आपण काटा – काटी करायला लागलो, की सारख तेच करावस वाटत. जसं काही दुसर्याचा पतंग कापला नाही आणि आपला कटला, तर आपण हरलो, असं. मग पतंग उडवण्यातली गम्मत निघून जाते. पतंग उडवायचा, तर त्यातली गम्मत हरवता कामा नये “.

काही तरी समजल्या सारखी शर्विनने मान डोलावली.